पुणे : स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी पोलिस पित्यास विशेष पॉक्सो न्यायालयाने मंजूर केलेला जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी रद्द केला आहे. तसेच आरोपीची दि. ४ जानेवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.
पोलिस असलेल्या आरोपीवर २०२२ मध्ये स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपीने विशेष पॉक्सो न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळविला होता. मूळ जामीन प्रलंबित असतानाही तपास अधिकारी यांनी वेळेपूर्वीच दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर झाला. मात्र आरोपीने मूळ फिर्यादीला त्रास दिल्यामुळे त्यांनी वकील सुशांत तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी, प्रज्ञा कांबळे, शुभांगी देवकुळे आणि प्रियांका घाडगे यांच्यामार्फत मार्च महिन्यात जामीन रद्द करण्याकामी अर्ज केला हाेता. हा अर्ज आठ महिन्यांपासून प्रलंबित होता.
दरम्यान, आरोपीने त्याच्या अंतरिम अर्जातील अटी-शर्तींचा भंग करून मूळ फिर्यादीला वारंवार धमक्या देणे, तिच्या पार्लरमध्ये जाऊन मारहाण करणे, वकिलांना जीवे मारेन, अशा धमक्या दिल्या. आरोपीने वकिलाला देखील धमकावले. यावरून फिर्यादीच्या वकिलांनी आरोपीचा प्रलंबित जामीन अर्ज रद्द करण्याबाबत युक्तिवाद केला. भारती विद्यापीठाचे पोलिस आरोपीला मदत करत असल्याचे दिसले. वकील दिनेश जाधव यांनी न्यायालयाकडे तक्रार केली असता, त्यांना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा अंतरिम जामीन न्यायालयाने रद्द केला आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली.