पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. यामुळेच कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले असून, पुण्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर गड्डीचे दर ५० ते ८० रुपयांवर जाऊन पोहोचले.
राज्यात आठ-दहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला आहे. याचाच परिणाम कोथिंबिरीच्या दरावर झाला असून, किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या गड्डीला हंगामातील उच्चांकी ८० रुपये दर मिळाला. सध्या पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात कोथिंबीर व अन्य पालेभाज्यांची आवक पन्नास टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. आवक कमी झाली तरी मागणी मात्र कायम असल्याने दर वाढले असल्याची माहिती भाजीपाला व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
कोथिंबिरीची घाऊक बाजारात एक गड्डी ४० ते ५० रुपयांवर पोहोचली असून, किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते ८० रुपयांवर पोहोचली. इतर पालेभाज्यादेखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.दिवाळीपर्यंत पालेभाज्या भाव खाणार
अवकाळी पावसाचा मोठा परिणाम शेतीमालावर झाला असून, सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला आहे. यामुळेच सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. याचा परिणाम दरावर झाला असून, पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.