बारामतीत थेट
तहसिलदार, मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर
बारामती :वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने प्रशासन नियमावलीचे पालन करण्याबाबत आवाहन करीत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या मार्गदर्शक नियमावलीचे पालन होताना दिसत नसल्याने रविवारी (दि. ७) बारामतीचे तहसीलदार विजय पाटील व बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी थेट रस्त्यावर उतरत विनामास्क फिरणारे नागरिक, दुकानदार, ग्राहक यांच्यावर कारवाई केली. बडे अधिकारीच करावाईसाठी रस्त्यावर आल्याने नियमाचे पालन न करणाऱ्यांची मात्र त्रेधा उडाली.
बारामती शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत प्रशासन आग्रही झाले आहे. मात्र, वारंवार आवाहन करून देखील विनामास्क फिरणारे नागरिक, काही दुकानदार नियमांना फाटा देत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे भर सुटीच्या दिवशी तहसीलदार विजय पाटील व मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी बारामती शहरातील दुकाने तपासली. यामध्ये दुकानामध्ये विनामास्क अढळणारे दुकानदार, ग्राहक यांच्या दंडात्मक कारवाई केली. सायंकाळ पर्यंत शहरातील ७० दुकानदार, ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. तसेच प्रत्येक ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला. मास्क न वापरणारे सुरक्षित अंतर न राखणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कारवाईमध्ये सातत्य देखील ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
बारामती शहरातील भिगवण चौक येथे विनामास्क अढळून आलेल्या दुकानदार व ग्राहकांवर कारवाई करताना तहसीलदार विजय पाटील व मुख्याधिकारी किरणराज यादव
०७०३२०२१-बारामती-०३