पुणे : परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची काेराेना तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. यामध्ये सिंगापूरहून आलेली महिला विमानतळावरील तपासणीत कोरोना बाधित आढळून आली आहे. ही ३२ वर्षीय महिला कोथरूड येथील रहिवासी असून तिला कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या तिला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
सध्या चीनसह इतर देशांत काेराेना वाढलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबरपासून मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळांवर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून, २ टक्के प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. त्यामध्ये तपासणीत ही महिला पाॅझिटिव्ह आली आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
कोरोनाबाधित महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. यातून तिला चीनमध्ये धुमाकूळ घालणारा बीएफ-७ हा आहे की, इतर व्हेरिएंटची लागण झाली आहे, हे कळेल. २४ डिसेंबरपासून आतापर्यंत विमानतळावर ७९ हजार ६८८ प्रवाशांपैकी १४६६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ३ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यांचे नमुने जिनाेम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे.