पुणे : सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या आदरांजली योजनेवरही कोरोनाचे सावट आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनच प्रत्येकी ५० रुपये घेतले जातात. पण लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वारसदारांसाठी आदरांजली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत स्वेच्छेने सुमारे ८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या वेतनातून योजनेसाठी ५० रुपये कपात करणे अपेक्षित होते. ही रक्कम निधन झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसदारांना दिली जाणार आहे. पण लॉकडाऊनमुळे पीएमपीची बससेवा ठप्प होती. अनेक कर्मचाºयांना वेतनही मिळाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कपात करण्यात आली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनापासून ही कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक कामगार अधिकारी सतिश गाटे यांनी काढले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात चार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २०० रुपये कपात केली जाणार आहे.
फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीतही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. या कर्मचाऱ्यांना आदरांजली योजनेचा लाभ मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले नाही, अनेकांना कामही नव्हते. त्यामुळे ५० रुपये कपात करता आले नाहीत. त्यामुळे या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत संभ्रम आहे. गाटे यांनीही याला दुजोरा दिला. लॉकडाऊन काळात काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांनाही योजनेचा लाभ द्यायचा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी रक्कम कपात करावी लागेल. त्यामुळे याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे गाटे यांनी सांगितले.----------