पुणे : काेराेना रुग्णसंख्या वाढीबाबत एक दिलासादायक बातमी आहे. एकवेळ राज्यात रुग्णवाढीबाबत टाॅप असणाऱ्या मुंबईसह ठाणे येथील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे. पुण्यातील रुग्णसंख्या देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमीच आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाली आहे. पुण्यातील रुग्णसंख्या गेल्या आठवड्यात ४७ टक्के हाेती, ती आता २८ टक्क्यांवर आली आहे. तीन-चार आठवड्यांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येच्या उतरत्या आलेखाला सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता आराेग्य विभागाने व्यक्त केली आहे.
काेराेनाच्या रुग्णवाढीची सुरुवात मुंबईपासून झाली आणि गेले चार आठवडे मुंबईत रुग्णसंख्या सातत्याने वाढत हाेती. त्यापाठाेपाठ ठाणे जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत होती. आता मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत आहे.
१७ टक्क्यांनी रुग्ण कमी
राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्या १७ टक्क्यांनी कमी झाली आहे. म्हणजेच ४ ते १० जुलै दरम्यान राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २२ हजार १५५ होती. या आठवड्यात ती १८ हजारांपर्यंत कमी झाली आहे. तसेच ५ जुलै रोजी मुंबईतील रुग्णसंख्या १७ टक्क्यांनी कमी झाली. पुण्यातील रुग्णसंख्या ४७ टक्क्यांनी, नागपूरमधील रुग्णसंख्या ४४ टक्क्यांनी वाढली होती.
८० टक्के रुग्ण पाच जिल्ह्यांत
राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८० टक्के काेराेना रुग्ण हे पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत, तर २० टक्के रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये आहेत. दर १५ दिवसांनी साधारणपणे १५०० नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.
पुण्यात काेराेना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कारण, मुळात येथे रुग्ण वाढण्यास मुंबईच्या तुलनेत उशिरा सुरुवात झाली हाेती. नागपूर वगळता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील रुग्णसंख्येत घट होत आहे. सध्याचे विषाणू ओमायक्रॉनचे उपप्रकार असल्याने त्याचा संसर्ग तितकासा वेगाने हाेत नाही. नवीन स्वरूपाचा विषाणू आला तरच वाढ हाेईल. सध्या ती शक्यता नसल्याने काही दिवसांत ही संख्या सर्व ठिकाणी कमी हाेईल.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथराेग सर्वेक्षण अधिकारी