पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे पतीचे निधन झाले होते. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना भोसरीतील फुलेनगर येथे शुक्रवारी (दि. १८) घडली. अवघ्या दोन महिन्यांमध्ये नऊ आणि अकरा वर्षांच्या चिमुरड्यांचे माता-पित्याचे छत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गोदावरी प्रकाश खजुरकर (वय ३०, रा. फुलेनगर भोसरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचा नाव आहे. प्रकाश उर्फ गुरुबशा खजुरकर (वय ३५) यांचे दोन महिन्यांपुर्वी १८ तारखेलाच कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या मागे ११ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा आणि ५२ वर्षांची आजी असा परिवार आहे. प्रकाश खजुरकर यांचा टीव्ही दुुरुस्तीचा व्यावसाय होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने त्यांनी नुकताच झेरॉक्सचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे प्रकाश यांचा दोन महिन्यांपुर्वी १८ तारखेलाच मृत्यू झाल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे यांनी दिली. पतीच्या मृत्युची तारीख १८ होती. त्या दिवशी अमावस्या होती. तेव्हापासून पत्नी गोदावरी पतीच्या विरहाने व्याकूळ झाली होती. गुरुवारपासून त्या पतीच्या वियोगाने रडत असल्याचे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. शुक्रवारी (दि. १८) पतीच्या मृत्युच्या तारखेच्या दिवशीच सकाळी पावणे नऊच्या सुमारास घरातील दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी गळफास घेतला. खजुरकर कुटुंब मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३५ वर्षांपासून फुलेनगर परिसरात वास्तव्यास आहे.
कोरोनामुळे पतीचे झाले निधन;पत्नीनेही संपवले जीवन; २ लेकरांवर कोसळले दुःखाचे आभाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 2:00 PM