पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात पुणे शहरातील तब्बल ५ हजार ८०१ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा काळ ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक घातक ठरला असून, त्याखालोखाल ४० ते ६० या वयोगटातील मृतांची संख्याही दीड हजारांच्या घरात आहे. फक्त कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या कमी असून कोरोनाव्यतिरिक्त अन्य व्याधी असल्यामुळे या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
कोरोना झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, हृदयरोग, कॅन्सर असे आजार असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडील आकडेवारीनुसार, शहरातील कोरोनाचा पहिला बळी ३० मार्च २०२० रोजी गेला. कोरोनामुळे आजवर ५ हजार ८०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, त्याच्या निम्मे प्रमाण महिलांचे आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात एका तृतीयपंथीयाचाही मृत्यू झालेला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात मृत्यूची संख्याही वाढली आहे. अनेकांना वेळेत रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार असतील तर रुग्णाची अवस्था बिकट होत असल्याचे चित्र आहे. कोविड विषाणूमुळे अन्य व्याधीग्रस्त तसेच अति मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांची फुप्फुसे मोठ्या प्रमाणावर निकामी होतात. तसेच वय अधिक असल्यामुळे एकाच वेळी त्यांची रोगप्रतिकारकशक्ती दोन्ही आजारांशी लढू शकत नसल्याचे पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
====
वयोगटानुसार मृत्यू (६ एप्रिलपर्यंत)
वयोगट मृत्यू
०-२०। १७
२१-४०। २४८
४१-६० १५१०
६१ ते पुढील वयोगट ३७५१
====
लिंगनिहाय मृत्यू
पुरुष ३७१३
स्त्री १८१२
तृतीयपंथी ०१