पुणे : कोरोना मृतदेहांच्या व्यवस्थापन करण्यात पालिका कमी पडत असून स्मशानभूमीत मृतदेहांची हेळसांड सुरू आहे. विद्युत दाहिनीचे दरवाजे बंद न करताच अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीतील कर्मचारी गांभीर्याने काम करीत नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे लक्ष्मण आरडे यांनी केला आहे.
आरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नायडू रुग्णालयाशेजारील कैलास स्मशानभूमीमध्ये हा प्रकार घडला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आला. विद्युत दाहिनीमध्ये मृतदेह सरकविण्यासाठी स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. परंतु, मृतदेह दाहिनीमध्ये सरकविण्यात आल्यानंतर दाहिनीचे दारच बंद करण्यात आले नाही. क्षणार्धात पेट घेतलेल्या मृतदेहाला आगीने वेढले. त्यामुळे दाहिनीच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह आत ढकलता येईना.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. पालिकेच्या खातेप्रमुख आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे यांनी केली आहे.
---
प्रशासनाकडून सुविधा; मात्र कर्मचारी गंभीर नाही
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई आहे. नागरिकांनी कैलास, येरवडा, औंध, कोरेगाव पार्क, कात्रज स्मशानभूमीत या मृतदेहांवरील अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. कैलास व अन्यत्र वेटिंग वाढल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील चार सदस्यांना मोफत पीपीई किट, मृतदेह पॅक करण्यासाठी बॅग व अन्य सुरक्षा साधने मोफत देण्यात येत आहेत. मोफत रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरी कर्मचारी मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे.