लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात दररोज दहा हजार नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढ असून, यात पुणे शहरातील सरासरी ५ ते ६ हजार रुग्ण व ग्रामीण भागात १५०० ते २००० रुग्ण वाढत आहेत. पुणे जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती खूपच नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात एका रुग्णामागे तब्बल १४ लोकांचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. होम आयसोलेशनपेक्षा लोक जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याला अधिक प्राधान्य देत आहेत.
राज्यात पुणे सुरूवातीपासूनच कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले आहे. यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर आहे. रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. परंतु, ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच कन्टेंमेन्ट झोन, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वर भर दिला. आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मागे १४ व्यक्तींचे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहे. सध्या शहरी भागापेक्षा काॅन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड केअर सेंटरची संख्या आणि लसीकरणामध्ये ग्रामीण भाग आघाडीवर आहे.
-------
जिल्ह्यातील एकूण रुग्ण : ९९८०६
ग्रामीण भागातील रुग्ण : १४५११
- गावांमध्ये होम आयसोलेशन असलेले रुग्ण : ७०५६
-------
ग्रामीण भागात एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आशा वर्कर्स ,अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. पुणे शहरालगतच्या मोठ्या गावांमध्ये हे प्रमाण कमी असले तरी अन्य ठिकाणी बऱ्यापैकी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते.
--------
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरची माहिती
पुणे महापालिका क्षेत्र : २७
पिंपरी-चिंचवड महापालिका : ३८
पुणे ग्रामीण : ७८
---
ग्रामीण भागात ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लसीकरणात आघाडीवर
ग्रामीण भागात सुरुवातीपासूनच काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिली. रुग्णांच्या सोयीसाठी मोठ्याप्रमाणात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. शहरी भागाच्या तुलनेत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे.तसेच लसीकरणामध्ये देखील आघाडीवर आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद