लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारून रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
पॅथॉलॉजी लॅबमध्येही चाचण्यांच्या शुल्काबाबत मनमानी दर आकारले जात असल्याचा प्रकार शहरात पहायला मिळत आहे. आरटीपीसीआरसाठी ८०० रुपये, तर अँटिजन टेस्टसाठी ५०० रुपये इतका दर आकारला जात आहे. रक्ताच्या तपासणीसाठीही वेगवेगळे दर आकारले जात आहेत. शासनाचे निर्णय धाब्यावर बसवणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांचे दर १ एप्रिलपासून कमी करण्यात आले होते. आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आणि रॅपीड अँटिजन टेस्टसाठी १५० रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. मात्र, शहरातील काही प्रयोगशाळांमध्ये दुप्पट दर आकारले जात आहेत.
चाचण्यांचे प्रमाण वाढवून अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अनेक नागरिक खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्याला पसंती देतात. शहरात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांपैकी ८ टक्के चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये होतात. याचाच फायदा घेत काही प्रयोगशाळांकडून मनमानी दर आकारले जात आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीने तीन प्रयोगशाळांशी फोनवरून संपर्क साधला असता वेगवेगळे दर सांगण्यात आले. काही प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर चाचणी करताना होम व्हिजिटसाठी ८०० रुपये आणि प्रयोगशाळेत जाऊन चाचणी केल्यानंतर ६०० रुपये आकारले जात आहेत. अहवाल प्राप्त होण्यासही २-३ दिवस लागत आहेत.
----
चाचण्या आणि दर
चाचणी लॅब १ लॅब २ लॅब ३
ॲंटिजन - ५०० ३५० ३००
आरटीपीसीआर - ८०० ६०० ६००
सीआरपी डी-डायमर १६०० १५५० १४००
-------
नियंत्रण कोणाचे?
कोरोना साथीच्या काळात दर एक-दोन महिन्यांनी कोरोना चाचणीचे दर शासनाकडून नियंत्रित केले जात आहेत. प्रयोगशाळांना तेच दर आकारण्याचे बंधन आहे. इतर तपासण्यांचे दर किटची किंमत आणि कालावधी यानुसार दर ठरवले जातात. स्थानिक पातळीवर दर नियंत्रित करण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रयत्न झाला आहे. कारण, काही प्रयोगशाळा अशास्त्रीय पद्धतीने कमी दर्जाचे साहित्य वापरून अत्यंत कमी दरात चाचण्या देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे किमान दर किती असावा, हे काही वेळा असोसिएशनकडून ठरवले जाते. कमाल दराबाबत मात्र थंब रूल नाही. कॉर्पोरेट लॅबमध्ये एका वेळी जास्त चाचण्या केल्या जात असल्याने किटही बल्कमध्ये कमी दराने मिळतात. त्यामुळे त्यानुसार चाचण्यांचे दरही कमी होऊ शकतात.
- डॉ. मंदार परांजपे, एमडी पॅथॉलॉजिस्ट