पुणे : “कोरोना आपत्तीत कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर आदी कामांवरील खर्चाची बिले अदा करण्याचे काम अजूनही चालू आहे़ येत्या मार्चअखेरपर्यंत सर्व बिले अदा केली जातील. त्यानंतरच कोरोना आपत्तीत महापालिकेचा किती खर्च झाला याचा निश्चित आकडा सांगता येईल,” अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
कोरोना आपत्तीत तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर रासने यांनी सांगितले की, स्थायी समितीने आत्तापर्यंत कोरोना आपत्तीत ७५ कोटी रुपयेच वर्गीकरणातून उपलब्ध करुन दिले. जम्बो हॉस्पिटलला महापालिकेच्या हिश्श्यापोटी ३२ कोटी रुपये दिले. प्रशासनाकडे कोरोना आपत्तीत झालेल्या खर्चाची माहिती मागविली आहे.
त्यामुळे मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोरोना आपत्तीत महापालिकेचा किती खर्च झाला, याचा निश्चित तपशील सांगता येईल. दरम्यान, आयुक्तांच्या विशेषाधिकारात कलम ६७/३ क अंतर्गत विनाटेंडर करण्यात आलेल्या कामांचा तसेच खरेदींचा तपशीलही मागविण्यात आला असल्याचे रासने म्हणाले.