पुणे : सर्वसामान्य पुणेकर नागरिकांसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या कुटुंबियांना पुणे पोलिसांनी मोठा दिलासा आहे. पोलीस वसाहतीत जाऊन तिथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. बाजारपेठेच्या तुलनेत अतिशय माफक दरात त्यांना या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाला कुठलाही धर्म कळत नाही. तुम्ही पोलीस आहात हे त्याला समजत नाही. तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन शहराचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलिसांना केले आहे. जीवनावश्यक सेवेचे किट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे किट देताना एका कुटुंबातील 4 व्यक्तीना किमान 8 ते 10 दिवस पुरेल एवढे साहित्य त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. गव्हाचे पीठ (5किलो), तांदूळ (2किलो), तूर डाळ (1 किलो), तेल (1 लिटर), साखर (2 किलो), चहा पावडर, मीठ, मसाले याचा समावेश किटमध्ये आहे. बाजारभावापेक्षा नाममात्र दरात पोलिसांना हे किट उपलब्ध होणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून जीवणावश्यक वस्तूसाठी आवश्यक ती सबसिडी घेण्यात आली आहे. यामुळे त्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ज्या पोलिसांना कामामुळे अत्यावश्यक सेवेची खरेदी करता येणं शक्य होत नाही त्यांच्याकरिता जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानिमित्ताने पोलीस कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी शहरातील प्रत्येक पोलिसांना एक किलो कांदा एक किलो बटाटा याचे वाटप केले. पोलीस कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात आले. सबसिडी त्या अत्यावश्यक मालावर उपलब्ध करून घेतले. या वस्तूचे वाटप पोलीस लाईन मध्ये करण्यात आले आहे. पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी काळजी करू नये. त्यांना मदतीचा हात आणि सहकार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे.
* पोलिसांना देण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमत काय ? यापेक्षा आपल्या घरातील कुणी सदस्य घराबाहेर पडणार नाही याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. कुणाचे पती, कुणाची पत्नी, मुलगा, मुलगी घराबाहेर काम करत आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या उद्देशाने पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाचा पूर्णत: बिमोड करायचा असल्यास आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. रवींद्र शिसवे (सहआयुक्त पुणे पोलीस)