पुणे: कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर परिणाम दाखवू लागली आहे. अनेक नागरिकांना या लाटेत जीव गमवावा लागत आहे. मागच्या वर्षी ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त लोकांना धोका असल्याचे सांगण्यात आले होते. पण सद्यस्थितीत जन्माला आलेल्या बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना कोरोनापासून धोका असल्याचे दिसून येत आहे.
चिंताजनक परिस्थितीत पुण्यातील तीन रुग्णालयात असणाऱ्या जन्मापासून ते २८ दिवसांमधील ११ नवजात बालकांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. परंतु त्यातील दहा बालकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अशी माहिती सह्याद्री रुग्णालयाच्या बालरोग व नवजात शिशु विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. महिलेच्या प्रसूतीनंतर बालकाची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र घरी गेल्यावर आईला अन्य कोणाकडून संसर्ग झाला. त्यानंतर बाळाला झाला असल्याचे ते म्हणाले आहेत.
अकरा बालकांची प्रकृती स्थिर होती. आता त्यापैकी दहा बालकांना घरी सोडण्यात आले आहे. नगर रस्त्याच्या सह्याद्री रुग्णालयासह, हडपसरचे नोबेल आणि भारती रुग्णालय या ठिकाणाहून ही माहिती समोर आली होती.
सूर्यवंशी म्हणाले, बालकांना योग्य ते उपचार देण्यात आले आहेत. एकाला त्रास झाल्याने ऑक्सिजन देण्यात आला होता. पण सर्वांची प्रकृती स्थिर होती. आता सध्या एका बालकावर उपचार सुरू आहेत.