- सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पश्चिम महाराष्ट्रात असून, आॅगस्टमध्ये संसर्ग दुप्पट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. ३१ जुलैला पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १लाख ३ हजार ४११ एवढी होती. हीच संख्या एका महिन्यात १ लाख ५३ हजाराने वाढून २ लाख ५७ हजार २०६ वर पोहोचली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. मे अखेर पुणे विभागात केवळ पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात संसर्ग नियंत्रणात होता. परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील संसर्ग वाढण्यास सुरूवात झाली. मुंबईनंतर सर्वांचे केवळ पुणे जिल्ह्यावर अधिक लक्ष होते. त्या तुलनेत अन्य जिल्ह्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते.
मास्क न वापरणे आणि गर्दीच कारणीभूत
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये लॉकडाऊन शिथील केल्यानंतरच ही संख्या वेगाने वाढण्यास सुरूवात झाली. शहरी भागासह ग्रामीण भागात मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे व सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करणे, यामुळे संसर्ग वाढत असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यात अँटिजेन
टेस्ट वाढविणार
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनही वाटा उचलणार आहे. अँटिजेन टेस्ट वाढविल्या जातील. पुन्हा सिरो सर्वेक्षण केले जाईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आदींची शनिवारी बैठक झाली.