आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या धोकादायक पद्धतीने वाढत आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येने साडेआठ हजारांचा टप्पा गाठला आहे. आत्तापर्यंत 132 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या तेराशेवर गेल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये आता जागा मिळत नाही. दरम्यान, शनिवारी रुग्ण संख्येचा विस्फोट होऊन तब्बल 233 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.यामध्ये मंचर शहरातील 51 रुग्णांचा समावेश आहे. मंचर शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता 30 एप्रिलपर्यंत शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहेत.पश्चिम आदिवासी पट्ट्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. कोंढवळ या गावी शनिवारी तब्बल 16 रुग्ण सापडले. पेठ गावात 20 तर घोडेगाव येथे 12 रुग्ण सापडले आहेत. अवसरी खुर्द गावात कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून शनिवारी येथे दहा रुग्ण सापडले आहेत.अनेक रुग्ण होम क्वॉरंटाईन होत असून त्यांच्यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे अशी मागणी केली जात आहे.
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा विस्फोट, 233 कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:09 AM