लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांत शहरीभागात नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच दररोज बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. परंतु, या उलट परिस्थिती ग्रामीण भागात असून संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सध्या ग्रामीण भागात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोजच्या मृत्यूचे प्रमाण देखील २८ ते ३० च्या दरम्यान आहे. सध्या एका दिवसातील बाधित रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. झपाट्याने वाढलेला संसर्ग, हॉटस्पॉट गावे आणि दुसरीकडे अँटिजेन किटचा तुटवडा असल्याने चाचण्यांमध्ये घट झाली आहे. कोरोना रुग्णांची चाचण्या होत नसल्याने पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे.
ग्रामीण जिल्ह्यामध्ये दररोज सात ते आठ हजार कोरोना चाचण्या होतात. सोमवारी (दि. ४) जिल्ह्यामध्ये पॉझिटिव रुग्णांची संख्या २ हजार ४९५ एवढी झाली. पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच १५ एप्रिल रोजी हीच संख्या १ हजार ७४२ ऐवढी होती. पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढू शकते. वीस दिवसांपासून लाॅकडाऊन सुरू आहे. तसेच हाॅटस्पाॅट गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी केली जाते. परंतु, लॉकडाऊन आणि हॉटस्पॉट गावांमध्ये अंमलबजावणी नीट होत नसल्याने आणि अनेक पॉझिटिव्ह रुग्ण गावभर फिरत आहे. संसर्ग वाढण्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे.
जिल्हा प्रशासनाने हॉटस्पॉट गावांमध्ये कोरोना चाचण्या वाढवल्या. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून चाचण्यासाठी आवश्यक असणारे अँटिजेन किटचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी कॅम्प रद्द करावे लागले. त्यामुळे बाधित असणाऱ्यांचे विलगीकरण करणे थांबले आहे. प्रत्यक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असूनही ती नोंदणीखाली आलेली नाही.
ग्रामीण रुग्णालयांकडून कोरोना मृत्यू संदर्भात अचूक नोंदी होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. अनेक ठिकाणी कोरोना मृतात्म्याच्या अंत्यविधीचे प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. अनेक गावे स्वतःच्या गावातील कोरोना व्यक्तीच्या मृत्यूच्या अंत्यविधीसाठी ही विरोध करत आहेत.
--
तलाठी, मंडलाधिकारी कुठे आहेत ?
ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि ग्रामसेवक यांची यंत्रणा झटून काम करताना दिसते. परंतु, महसूल स्तरावरील तलाठी मात्र गावातून गायब आहेत. पोलीस यंत्रणेचेही अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तलाठी गावात राहत देखील नाहीत. लॉकडाउन, हॉटस्पॉट यांच्या अंमलबजावणीपासून तलाठी अलिप्त आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने गाव पातळीवरील नियंत्रणामध्ये सक्रिय सहभाग असलेला तलाठी मंडलाधिकारी कुठे आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.
--
आरोग्य कर्मचारी, आशा वर्करवरील भार दुपटीने वाढला
ग्रामीण क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य यंत्रणा ही लसीकरणामध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन तसेच हॉटस्पॉट गावांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी करावयाचे उपाय, घरटी सर्वेक्षण यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांच्यावरील भार दुपटीने वाढला असून जिल्ह्यातील कोरोनाचे चित्र विदारक बनत चालले आहे.