एनसीएलचा पायलट प्रोजेक्ट : तिसऱ्या लाटेबाबत अंदाज बांधणे शक्य
पुणे : मैलापाण्याच्या नमुन्यांचा अभ्यास करून त्यात कोरोना विषाणू आहे की नाही, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यातून पुण्याच्या सांडपाण्यात कोरोना विषाणू असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
एनसीएलने डिसेंबर २०२० पासून हा प्रकल्प हाती घेतला. यात शहरातल्या मैलापाण्याच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. या वेळी कोरोनाचे विषाणू आढळून आले. एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. महेश धारणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “अन्य अनेक घटकांमुळे सांडपाणी ‘डायल्यूट’ होत असते. त्यामुळे त्यात शंभर विषाणू असतील तर त्यातला एखादाच आढळून येतो.” यापूर्वी पोलिओच्या साथीमध्ये ‘वेस्ट वॉटर इपिडेमॉलॉजी’चा वापर करण्यात करण्यात आल, असेही त्यांनी नमूद केले. पुण्याच्या मैलापाण्यातील कोरोना शोध मोहिमेत डॉ. सय्यद दस्तागर आणि डॉ. संजय कांबळे यांचाही समावेश आहे.
या प्रकल्पासाठी चार मैलाशुद्धीकरण केंद्रांमधील २३ नमुने, नदीत मिसळणाऱ्या नाल्यांमधील १७ नमुने, एनसीएल कॉलनी परिसरातील ९ नमुने अभ्यासण्यात आले. यासाठी पुण्यातील इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य लाभले. ‘पॉलिमरेज चेन रिॲक्शन’च्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. त्या माध्यमातून शास्त्रज्ञ निष्कर्षाप्रत पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैज्ञानिकांच्या पथकाने या अभ्यासाचे अधिकृत सादरीकरण केले. याबाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे.
चौकट
“मैलापाण्यातल्या कोविड विषाणूचा अभ्यास ‘एनसीएल’ कायमस्वरूपी करणार आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट केव्हा येईल, याचा अंदाज बांधण्यासाठी त्याचा उपयोगी होईल. एनसीएलने यासंदर्भात काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याचे सादरीकरण केले आहे. मुख्यमंत्र्यांनी महापौरांना यात लक्ष घालण्याची सूचना केली आहे. पालिकेतही ‘एनसीएल’कडून याबाबत लवकरच सादरीकरण होईल.”
-विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका
-----