पुणे : नाशिक येथे २६ ते २८ मार्चदरम्यान ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. राज्यात १० फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. आकडेवाढ कायम राहिल्यास संमेलन पार पडणार की पुढे ढकलले जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयोजकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्याची तयारी केले आहे. पुढील १५ दिवसांतील स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
संमेलनातील गाळ्यांसाठी आणि प्रतिनिधींसाठी नोंदणीला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. नोंदणीला सुरुवात होण्यापूर्वीच १२० गाळे आणि ७०-८० प्रतिनिधींची नावे आयोजकांकडे आली आहेत. संमेलनाची जोरदार तयारी सुरु असताना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. संख्या अशीच वाढत राहिल्यास संमेलनाबाबत काय निर्णय घेतला जाणार, अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरु झाली आहे. संमेलनासाठी राज्यभरातून अनेक साहित्यप्रेमी हजेरी लावतात. परिसंवाद, कविसंमेलने अशा कार्यक्रमांसाठी येणाऱ्या निमंत्रितांची संख्याही मोठी असते. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी संमेलनात ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमले जाणार आहेत.
लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, ‘सर्व जागांचे निर्जंतुकीकरण, फवारणी, खुर्च्यांमध्ये अंतर, प्रत्येक सभागृहात एकूण क्षमतेच्या निम्म्याच लोकांना परवानगी, निमंत्रितांसाठी एका खोलीत दोन वेगवेगळे बेड अशी दक्षता घेतली जाणार आहे. संमेलनाच्या सर्व समित्यांमधील प्रत्येक सदस्याची कोविड टेस्ट केली जाणार आहे.
------------------------
पुढील १५ दिवस रुग्णसंख्येबाबत चढ-उतार लक्षात घेतले जातील. घाईघाईने कोणतेही निर्णय होणार नाही. संमेलनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम नियोजन केले आहे. संमेलन ऑनलाइन घेण्याचा कोणताही विचार नाही. मुळात संमेलन ऑनलाइन कसे होऊ शकेल? ते केवळ अतिउत्साही लोकांचे काम आहे.
- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ
------------------------
संमेलनस्थळी सर्व वैद्यकीय सुविधांची तयारी होत आहे. संमेलनस्थळी छोटेखानी रुग्णालय उभारणार आहोत. संमेलनस्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या रुग्णालयांमध्ये पाच-पाच बेड राखीव ठेवले आहेत. त्याउपर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करु.
- जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ
--------------------------