लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र असतानाच, शहरासाठी शनिवार (दि. ६) सुखद वार्ता घेऊन आला. ३० मार्च २०२० नंतर एप्रिलचा पहिला पंधरवडा वगळता शनिवारी प्रथमच पुणे शहरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही.
कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात शहरात दररोज सरासरी ३० पेक्षा जास्त कोरोना बळी जात होते. दिवाळीनंतर मृत्यूची आकडेवारी दैनंदिन दहापेक्षा कमी झाली. पुण्यात ९ मार्च, २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर सातत्याने बाधितांची संख्या वाढत गेली आणि ३० मार्च २०२० रोजी कोरोनाबाधिताचा पहिला बळी पुण्यात गेला होता. एप्रिल २०२० महिन्यातले पहिल्या पंधरवड्यातील काही दिवस वगळता त्यानंतर कालपर्यंत (दि. ५, शुक्रवार) दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होत होता.
शहरात कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूपैकी केवळ कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी होते. अन्य आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची नोंद आत्तापर्यंत कोरोनामुळे झालेले मृत्यू अशी घेतली गेली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने घराघरात पोहचून अन्य व्याधीग्रस्त, वयोवृद्ध यांची नोंद घेतली. त्यांना वेळीच औषधे उपलब्ध करून दिली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. परिणामी, आज शहरात केवळ १ हजार ४०७ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ९० टक्के रुग्ण लक्षणेविरहीत आहेत. तर ६० टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ २१२ असून व्हेंटिलेटरवर १२ रुग्ण आहेत.
चौकट
कोरोना विरोधी लढ्याला मोठे यश
“३० मार्च २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण दगवला. त्यानंतर काही दिवस कोरोना मृत्यू झाले नाहीत. पण १५ एप्रिल २०२० नंतर आजवर एकही दिवस असा नव्हता जेव्हा कोरोनाबळी गेला नाही. कोरोनाविरुद्ध लढा अजूनही सुरू असला तरी आज या लढ्याला मोठे यश मिळाले. कोरोना विरुध्दच्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य सेवकांसह, कोरोना आपत्तीत सहकार्य करणाऱ्या सर्व पुणेकरांचे या यशात मोठे योगदान आहे,” अशी भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.