पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे; परंतु हे ५० हजार रुपये लाटण्यासाठी सर्वच नातेवाईक सरसावले असून, एका मयत व्यक्तीसाठी तीन-चार नातेवाईकांकडून अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून, नक्की अर्ज कुणाचा मंजूर करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये ज्या व्यक्तीचा अर्ज पहिला असेल तो अर्ज मंजूर करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
कोरोनाने मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजारांची मदत मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या १९ हजार ६६७ वर जाऊन पोहोचली आहे तर कोरोनामुळे नोकरी गेली, कामधंदे नसल्याने उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या केलेल्या नागरिकांची संख्यादेखील बरीच असू शकते.
या सर्वांच्या वारसांना अखेर शासनाची मदत मिळणार आहे. शासनाचे ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी आतापर्यंत तब्बल २८ हजार ९०२ अर्ज केले आहेत. यापैकी तब्बल १९ हजार ३६० अर्ज मंजूर करण्यात आले असून, ९३९० अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या अर्जावर सुनावणी घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.
या कारणांमुळे नाकारले अर्ज-
जिल्ह्यात तब्बल २८ हजार ९०२ पेक्षा अधिक लोकांनी ५० हजार रुपयांचे अनुदानासाठी अर्ज केले आहेत; परंतु अनेक अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केले नाहीत. पुण्याची व्यक्ती पण मृत्यू दुसऱ्या राज्यात झाला, कोरोनानंतर ३० पेक्षा अधिक कालावधीनंतर मृत्यू झाल्याने अशा विविध कारणांनी अर्ज नामंजूर होत आहेत.
जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी हाच उद्देश-
जिल्ह्यात तब्बल २९ हजार लोकांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत. यापैकी आतापर्यंत १९ हजार पेक्षा अधिक लोकांचे अर्ज मंजूर केले आहेत. नामंजूर झालेल्या अर्जाची सुनावणी घेऊन हे अर्ज देखील मंजूर करण्यात येणार आहे.
- विठ्ठल बनोटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी