पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागाला यंदा कोरोनाचा फटका बसला असून तब्बल 11 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. प्राणी संग्रहालये, उद्याने, प्रदर्शने बंद असल्याने विभागाचे उत्पन्न बुडाले असून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यास आणखी फटका बसू शकतो.
पालिकेच्या उद्यान विभागाचे शहरात कात्रज प्राणी संग्रहालये, 200 पेक्षा अधिक उद्याने आहेत. मार्चमध्ये जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरु होते, तेव्हाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्व उद्याने आणि प्राणी संग्रहालये बंद करण्यात आली. आताशा उद्याने निर्बंधांसह सुरु झाली आहेत. उद्यानांमध्येही व्यायाम, खेळ आदींना बंदी घालण्यात आली आहे. केवळ चालण्याकरिता उद्यानांचा वापर करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यातच कोरोना पुन्हा वाढू लागल्याने ही उद्याने पुन्हा बंद करावी लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उद्यान विभागाकडून दरवर्षी फळे-फुले-भाजीपाला महोत्सव आयोजित केला जातो. यासोबतच जून ते आॅगस्टदरम्यान वन महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात अल्पदरात रोप विक्री केली जाते. जवळपास 35 ते 40 हजार रोपांची विक्री या महोत्सवामध्ये केली जाते. यासोबतच दिवाळीमध्ये किल्ले प्रदर्शन, जागतिक पर्यावरण दिन, वन्य प्राणी सप्ताह आदी उपक्रम राबविले जातात. यामधूनही उद्यान विभागाला 11 ते 12 कोटींचा महसूल मिळत असतो. परंतू, मागील 11 महिन्यांपासून कोरोनामुळे उद्याने आणि सर्व उपक्रम बंद असल्याने यंदा एक कोटीचेही उत्पन्न मिळालेले नसल्याचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.