पुणे : कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे.परिणामी पालिका प्रशासनाने सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची पुर्नरचना करण्याचे नियोजन केले आहे. विविध विकास कामांना व अनावश्यक खर्चांना कात्री लावून या अर्थसंकल्पाची मांडणी केली जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, महापालिकेच्या उत्पन्नावर कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे मोठा परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने, आहे त्या उत्पन्नामध्ये प्राधान्याने अत्यावश्यक सेवांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.उद्याने उभारणी, रस्ते सुशोभिकरण, नवीन वास्तू उभारणी अशा खर्चांना आळा घालण्यात येणार आहे. याचबरोबर ठेकेदारांकडून कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणाºया कामगार वर्गही कमीत कमी सख्येने घेण्याबाबतचे आदेश पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत वारंवार वाढल्याने राज्य शासनाकडून जीएसटीची रक्कम किती येईल याचीही आता शाश्वती नाही. तसेच मिळकत कराची वसुलीही यावर्षी सवलत दिल्या जाणाऱ्या पहिल्या दोन महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. तर बांधकाम, आकाश चिन्ह विभागाकडून मिळणारा महसूलही गेल्या दीड महिन्यांपासून थांबला आहे. परिणामी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची पुनर्रचना प्रशासनाकडून करून हा अर्थसंकल्प लवकरच स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे.
कोरोनाचा पुणे महापालिकेला फटका; उत्पन्न घटल्याने नियोजन कोलमंडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:48 PM
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प
ठळक मुद्देअर्थसंकल्पाची पुनर्रचना लवकरच केली जाणार बांधकाम, आकाश चिन्ह विभागाकडून मिळणारा महसूलही थांबला गेल्या दीड महिन्यांपासून