गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीला रोखण्यासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न करीत आहे. याकाळात कोरोना प्रादुर्भावाच्या दोन लाटा आल्या, आता तिसऱ्या लाटेची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शासकीय पातळीवरून कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशपातळीवरून ते अगदी ब्लॉक पातळीपर्यंत प्रशासन वेगवेगळया पद्धतीने प्रयत्न करीत आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही याबाबत प्रत्येक तालुक्यातील हॉट स्पॉट ठरलेल्या गावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आजपासून पुरंदर तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या नीरा, मांडकी, जेऊर,नावळी, वीर, दवनेवाडी, भिवडी, पारगाव, पिसर्वे, पिंपरी, दहा गावांबरोबरच इतरही कोरोनाबाधित १६ गावांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्या त्या भागातील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, त्या गावाचे ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना घेऊन ५० कुटुंबांमागे दोन जणांचे एक पथक अशी एकूण १०३ पथके नेमण्यात आली आहेत.
पुरंदर तालुका प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम आखलेला आहे. या मोहिमेचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास नक्कीच यश येणार असल्याने मोहिमेचे स्वागत होत आहे. आजपासून गावागावांत ही मोहीम राबवली जात आहे.
हॉट स्पॉट असणाऱ्या व कोरोनाबाधित असणाऱ्या गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी या मोहिमेला सर्वतोपरी प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी आवाहन केले आहे.
मात्र, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची ही कोरोना चाचणी अपेक्षित आहे. त्यांची चाचणी नसेल तर अशा व्यक्तीही कोरोना प्रसारास कारणीभूत ठरू शकतात . प्रशासनाने याकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
--
चौकट
पथकांना कुटुंब नेमून दिले आहेत. कुटुंबात जाऊन त्यांचे सर्वेक्षण करणे, कोरोना बाधित असणाऱ्या गावांतील प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीची कोरोना चाचणी करून घेणे, हॉट स्पॉट असणाऱ्या संपूर्ण गावातील नागरिकांची, यात प्राधान्याने हाय रिस्क आणि लो रिस्क यादी तयार करून त्यांची कोरोना चाचणी करून घेणे, त्याच बरोबर गावातून नोकरी व्यवसायासाठी गावाबाहेर जाणाऱ्या व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकतात त्यांची यादी बनवून त्यांच्या चाचण्या करणे हे उद्देश आहेत.
--
फोटो मेल केला आहे कोळविहिरे येथे कोरोना चाचणी करताना आरोग्य कर्मचारी