पुणे: प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी कोरोनामुळे नागरिकांना पासपोर्ट काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे परदेशवारी सोपी झाली असली तरी कोरोनाच्या आडकाठीमुळे नागरिकांना परदेशात जाता येत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षांत निर्माण झालेल्या कोरोना स्थितीमुळे नागरिकांना परदेशातच काय पण देशातही फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. जगभरातील अनेक देशांनी भारतीय नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध आणले होते. त्यातच कोरोनामुळे अनेक दिवस पासपोर्ट कार्यालय बंद ठेवावे लागले होते. केवळ तातडीच्या सुविधा नागरिकांना दिल्या जात होत्या. त्यामुळे इच्छा असूनही नागरिकांना पासपोर्ट काढणे शक्य होत नव्हते. तसेच पासपोर्ट काढल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करण्यास बराच वेळ लागत होता. कोरोनामुळे पुण्यातील अनेक नागरिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन लांबले होते.
नागरिकांनी लांबवला प्रवास
कोरोनामुळे खासगी पर्यटन कंपन्यांमार्फत नागरिकांना कुठेही फिरण्यासाठी जाता आले नाही.त्यामुळे नागरिकांनीही आपला प्रवास लांबवला. तसेच पासपोर्ट काढण्याचे नियोजनही पुढे ढकलले. परिणामी गेल्या दोन वर्षांत पासपोर्टसाठी अर्ज करणा-या पुण्यातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले.
पासपोर्टसाठी प्राप्त झालेल्या पुण्यातील अर्जांची संख्या
२०१९ : १ लाख ३३ हजार ९०६
२०२० : ५७ हजार ६५९
२०२१ : २७ हजार ६६४ (जून २०२१ पर्यंत)