पुणे : गेली दाेन वर्षे काेराेनामुळे शाळा बंद असल्याने मुले घरकाेंबडे झाली हाेती. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचालही हाेत नव्हती. तसेच ऑनलाइन अभ्यासाचा फारसा ताण नसल्याने शालेय मुले लठ्ठ झाली आहेत, असे निरीक्षण शाळामधील शिक्षकांसह डाॅक्टरांनी नाेंदवले आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षाचे शेवटचे काही महिने वगळता मागील दाेन वर्षे म्हणजे २०२० ते २१ आणि २०२१ ते २२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात शाळा भरलीच नाही. त्यांना माेबाइलवर शिक्षण घ्यावे लागले. त्यासाठी त्यांना काेठे बाहेर जाण्याची गरज पडली नाही. सर्व शिक्षण माेबाइलवरच हाेते. दाेन वर्षे उद्याने, मैदाने देखील बंद हाेती. मग व्यायाम करणे किंवा खेळण्यासाठीही बहुतेक मुलांना बाहेर पडता आले नाही.दिवसभर घरीच असल्याने हवे त्यावेळी जेवण करायचे आणि अभ्यासासाठी माेबाइलवर बसायचे हा मुलांचा दिनक्रम हाेता. त्याचा परिणाम मुलांच्या तब्येतीवर झाला आहे. तब्बल दाेन वर्षांनंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल शिक्षकांना स्पष्ट जाणवत आहेत. डाॅक्टरांनाही हाच अनुभव येत आहे.
मुलांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे करा
- पालकांनी मुलांच्या शिक्षणाबराेबरच शारीरिक खेळांकडे लक्ष द्यावे.
- मुलांना बैठ्या माेडमधून ग्राऊंड माेडमध्ये आणावे
- डब्यात काय आणायचे हे शाळांनी आखून दिल्यास उत्तम.
- शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर एक तास ग्राऊंडवर खेळवणे, पळवणे.
- कँटीनमध्येही घरी खाल्ले जाणारे हेल्दी फूड पुरवणे गरजेचे आहे.
घरी बसून राहिल्याने मुले लठ्ठ झाल्याचे दिसून येत आहे. मुलांना शाळेत येण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. तसेच मैदानावर खेळ खेळल्याने त्यांचे वजन कमी हाेते. अभ्यासाचा ताण वाढल्याने लवकरच हे वजन कमी हाेईल.
- एक मुख्याध्यापक
काेराेना काळात मुलांसह पालक लठ्ठ झाल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लाटेत शरीराला व्यायाम करायला वेळ मिळाला हाेता. अनलाॅक झाले तसे मुलांचे शरीर पुन्हा त्याच स्थितीत आले. मुलांना लठ्ठपणातून बाहेर काढण्यासाठी सकाळी व सायंकाळी मैदानावर खेळून देणे गरजेचे आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी गुण द्यायला हवेत. तेव्हा मग आईबापही मुलांना खेळायला ग्राऊंडवर पाठवतील.
- डाॅ. जयश्री ताेडकर, स्थूलविकार तज्ज्ञ तथा बॅरियाट्रिक सर्जन