लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण राज्यातच फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लाखो लोक कोरोनाच्या विळाख्यात सापडले व यामुळेच शासनाने एप्रिल महिन्यापासून राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला. या लाॅकडाऊनचा राज्यातील दस्त नोंदणीवर मोठा परिणाम झाला असून, नवीन घर खरेदीत चांगलीच घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
एक वर्षापूर्वी मार्च महिन्यात राज्यात कोरोना महामारीने शिरकाव केला. त्यानंतर झपाट्याने मोठ्या शहरांबरोबर खेड्यापाड्यापर्यंत कोरोनाची लागण झाली. यामुळेच थेट केंद्र शासनाने संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन लागू केला. याचा सर्वच उद्योग-धंद्यावर मोठा परिणाम झाला. दीड-दोन महिने दर राज्यातील दस्त नोंदणी पूर्णपणे बंद होती. यात ‘बिगीन अगेन’ अंतर्गत हळुहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले, पण बांधकाम व्यवसाय सावरू शकला नाही. यामुळेच शासनाने बांधकाम व्यावसायला उभारी देण्यासाठी दस्त नोंदणीत तीन टक्के आणि नंतर दीड टक्का सूट दिली. याचा चांगला परिणाम झाला आणि पहिल्या लाॅकडाऊनमध्ये झालेला सर्व परिणाम या सवलतीमुळे भरून निघाला. या सवलतीमुळे कोरोनाकाळात काही प्रमाणात उभारी मिळाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तीन-चार महिन्यांत सावरत असतानाच मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ शासनावर आली. राज्य शासनाने केलेले लाॅकडाऊनमध्ये सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होती. पण कोरोनाचा विळाखाच एवढा मोठा आहे की लोकांनी नवीन घर खरेदीकडे जवळजवळ पाठच फिरवली. याचमुळे एप्रिल २०२१ मध्ये केवळ २.८३ टक्के आणि मे महिन्यात ३.७३ टक्के दस्त नोंदणी झाली आहे. ही देखील नवीन घरांची दस्त नोंदणी न होता, केवळ शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त खरेदी केलेल्या ग्राहकांनी दस्त नोंदणी केली.
----------
राज्यातील लाॅकडाऊनमध्ये झालेली दस्त नोंदणी
महिना दस्त संख्या महसूल (कोटीत) टक्के
एप्रिल २०२१ १३४९२२ ८४५.८२ २.८
मे २०२१ २४३७९९ १११८.८६ ३.७३