पुणे : पुण्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा फटका आता पुन्हा हवाई क्षेत्राला बसत आहे. पुणे (लोहगाव) विमानतळावरून रोज उडणारे जवळपास २० ते २५ विमाने रद्द होत आहेत. प्रवासी संख्या घटल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या विमाने रद्द करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रोजचे ७० - ७५ विमानांची होणारी वाहतूक आता ४० ते ४५ इतकी होत आहे. रद्द होणाऱ्या विमानांमध्ये दिल्ली, जयपूरला जाणाऱ्या विमानांचा अधिक समावेश आहे.
वास्तविक हा हंगाम विंटर शेड्युलचा आहे. यात प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र, कोरोनाचे वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. काही विमानाचे अवघे ५ ते ७ इतकेच बुकिंग झाल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या ते विमान रद्द करीत आहेत. पुण्याहून झेपावणारे रोजचे जवळपास २० ते २५ विमाने रद्द होत असल्याने त्याचा अन्य बाबींवर देखील परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही जवळपास १७ ते १८ हजार झाली होती. ती आता ११ ते १३ हजार इतकी झाली आहे.
''काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी होत असल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्या आपले उड्डाण रद्द करीत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे पुणे विमानतळाचे संचालक संतोष डोके यांनी सांगितले.''