पुणे : शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाले म्हणजे आता आपल्याला कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26 हजार 148 लोकांना कोरोना लसीकरणानंतर देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोसनंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, यात ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. यामुळेच लसीकरण पूर्ण झाले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
देशाने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असतानाच पुणे जिल्ह्यात देखील 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण करत कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता पर्यंत तब्बल 11 लाख 25 हजार 822 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेला. गेल्या काही महिन्यांत लसीकरण झाल्यानंतर त्यातही कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर लोक अधिक बेफिकीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरण झाल्यानंतर मास्क वापरण्याची गरज नाही, दोन डोस घेतलेल्या लोकांना मिळत असलेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास या सर्व गोष्टींचा परिणाम दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक वाढले. कोरोनाचा पहिला डोस घेतलेले 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्यापैकी 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होणा-यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत.
- कोरोना लसीकरणानंतर 26 हजार 148 लोकांना कोरोनांची लागण
- पहिल्या डोस नंतर 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण
- दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण
कार्यक्षेत्र | कोरोना लसीकरण | लसीकरणानंतर बाधित |
पुणे मनपा | 4937074 | 11886 |
पिंपरी-चिंचवड | 218703 | 8135 |
ग्रामीण | 4633809 | 6127 |
एकूण | 11758486 | 26148 |