लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली असून पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अशात सध्या शहर पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला केवळ ३ ते ४ पोलिसांना लागण होत होती. आता हेच प्रमाण १५ च्या पुढे गेले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागण झाली असून ते उपचार घेत आहेत. आतापर्यंत १ हजार ७०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १२ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग वाढू लागल्याने काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच त्यामुळे साप्ताहिक बैठकाही सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर पोलीस दलातील १ हजार ४७५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. पुणे शहरात कोरोना संसर्ग सर्वच पातळीवर वाढू लागला. तसा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या १४४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटल तसेच घरी उपचार करण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आता पुन्हा हॉस्पिटलमधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कोरोनासंबंधी कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांच्या लसीकरणास सुरुवात केली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
--
पोलीस दलात ९५ टक्के लसीकरण पूर्ण
शहर पोलीस दलातील ९५ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ८५ टक्के पोलिसांनी पहिला डोस घेतला आहे. तर १० टक्के पोलिसांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ५ टक्के पोलिसांनी अद्याप लस घेतलेली नाही़.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे