पुणे: पुणे शहर पोलीस दलातील (परिमंडळ 4) विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून या पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या भावाला देखील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आईलाच कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पुणे शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस कर्मचारी हा पूर्व भागातील एका पोलिस वसाहतीत वास्तव्यास आहे. परिमंडळ चार विभागातील एका पोलीस स्टेशनला तो कार्यरत आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. वायसीएम येथे त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला. त्यानंतर सदर पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या लहान भावाला देखील तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या आईची प्रकृती स्थिर आहे. कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यातच पोलीस दलातील कुटुंबियातील आईलाच करण्याचा संसर्ग झाल्यामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. या घटनेमुळे पुणे शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्ती व पोलीस कर्मचारी यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली असून सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान पोलीस कर्मचारी सेवेत असणाऱ्या पोलीस स्टेशनमधील एक अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी व एक महिला कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मात्र आजाराचा संसर्ग होऊ नये व त्यांच्या प्रकृतीची काळजी योग्य वेळेतच घेण्यात यावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने त्यांना वैद्यकीय अहवालानुसार होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी गेली अनेक दिवसांपासून दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. मात्र आज त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला करणाचे लागण झाल्यामुळे आता पोलिस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या संपर्कात येत असून त्यांना देखील आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वत:ची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.
पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाचा संसर्ग; वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 1:00 AM
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
ठळक मुद्देवायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल