प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या ८ हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली आहे. सध्या पुण्यातील कोरोना संसर्गाचा आलेख सर्वोच्च बिंदूवर असून पुढील आठ दिवसांचा कालावधी शहरासाठी ‘आत्यंतिक कसोटी’चा असेल, असे भाकीत भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी केले.
साधारणपणे १८ मार्चनंतर शहरातील लोकसंख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज डॉ. ललवाणी यांनी १२ मार्च रोजी व्यक्त केला होता. तो बरोबर आला. पुणे पहिल्यापासूनच कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा वेग खूप जास्त आहे. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या रविवारपर्यंत (दि.१८) रुग्णसंख्या आणखी मोठा पल्ला गाठेल. त्यामुळेच हे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. ललवाणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पुण्यातील आरोग्य व्यवस्था वेगाने काम करत असल्याने आठवड्याभरात प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल, असा दावा त्यांनी केला.
ललवाणी म्हणाले, “सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यातील १० टक्के लोकांना आयसीयूची गरज भासत आहे. लॉकडाऊन न केल्यास रुग्णसंख्येवर नियंत्रण राहणार नाही. आताच्या मिनी लॉकडाऊनचा ३०-४० टक्के परिणाम दोन आठवड्यांनी पाहायला मिळेल. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून प्रसार होत होता. आता कुटुंबे, संपूर्ण सोसायटी ‘पॉझिटिव्ह’ होताना दिसत आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनने तो प्रसार कसा थांबवणार, हे पाहावे लागेल. पार्शियल लॉकडाऊन सात दिवसांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. कारण, लोक पुन्हा आपापल्या गावी परतू लागल्यास अर्थचक्र पुन्हा बिघडेल. त्यामुळे सध्या शासनाने लसीकरणावर भर देणे आणि नागरिकांनी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे.”
चौकट
काय असेल मृत्यूदराची स्थिती?
सध्याची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाने २९५ लोकांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत दैनंदिन मृत्यूचा आकडा ७००-८०० पर्यंत जाऊ शकतो. पुढील आठवड्यात मृत्यूची संख्या हजारापर्यंत जाऊ शकते. लॉकडाऊनचा परिणाम दोन आठवड्यांनी दिसू लागेल आणि मृत्यूदर कमी होईल. १५ एप्रिल ते ३१ मे हा कालावधी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
चौकट
१२ एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अंदाज
– ऑक्सिजनविरहीत फक्त ९ खाटा शिल्लक राहतील.
– ३२०७ ऑक्सिजन खाटांची कमतरता भासेल.
– ४६२ आयसीयू खाटा शिल्लक राहतील.
– ६४७ व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल.