नीरा नजीकच्या खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केली जात आहे. मागील आठवड्यात ६, शुक्रवारी १२ तर शनिवारी २ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. शनिवारी तपासणी केलेल्या ८ शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल रविवारी पाॅझिटिव्ह आल्याची माहिती लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बागडे यांनी दिली.
या सर्व २० विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याने त्यांना आश्रम शाळेतीलच संस्थात्मक विलिगीकरण कक्षात ठेवलेले आहे. तसेच पूर्वी चाळीस विद्यार्थ्यांचे घेतलेले नमुने निगेटिव्ह आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक उत्तम माने यांनी दिली.
नीरा शहर हे पुणे-सातारा जिल्हा सीमेवरील गाव आहे. नीरा नदीच्या पैलतीरावर शहरापासून अगदी दोनशे मिटरवर समता आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी निवासी आहेत. तर नीरा परिसरातील काही गोरगरीब विद्यार्थी या शाळेत फक्त शिक्षण घेतात. या शाळेतच कोरोना काळात कोरोना सेंटर होते. फलटण, खंडाळा तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी क्वारंटाइन व उपचारासाठी दाखल होते. आता ही शाळाच कोरोनाचा हाॅटस्पाॅट होऊ पाहत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.