बारामती : शेवटी ‘आई ती आईच’ असते. तिची जागा कोणीच घेवू शकत नाही. आईची व्याख्या अधोरेखित करणारी अनोखी घटना बारामतीत घडली आहे. फुफ्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेने तत्पर उपचार आणि तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर बाळाला सुखरुप जन्म दिला आहे. डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या या मातेच्या मांडीवर नवजात बालकाला ठेवत तिचे मनोबल वाढविले. कोरोनामुळे भयभीत होत खचणाऱ्या रुग्णांसमोर ही माता आदर्श ठरली आहे.
बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ही किमया साधली आहे. शहरातील फिजिशियन डॉ. सुनील ढाके, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विशाल मेहता, डॉ. टेंगले, डॉ. अुनराधा भोसले, भुलतज्ञ डॉ. सुजित अडसुळ, डॉ. निकिता मेहता, बालरोगतज्ञ डॉ. अमित कोकरे, होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमोल भगत, डॉ. हर्षा जाधव यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले. त्यासाठी केईएम रुग्णालयाचे डॉ. विवेक जोशी, डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ. शुभांगी वाघमोडे, डॉ. आनंद गवसणे यांचा सल्ला व मार्गदर्शन महत्वाचा ठरल्याचे डॉक्टरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
६ एप्रिल रोजी गर्भारपणाचा ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेली २८ वर्षीय महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाली. ही महिला मूळची देऊळगाव राजे येथील शेतकरी कुटुंबातील असून तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते. या महिलेलादेखील दाखल करताना कोविडमुळे ताप, खोकला, धाप लागणे असा त्रास होता. तसेच ऑक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती. दोन तीन दिवसांनी तिची ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. कोविड मेडिकल मॅनेजमेंट नुसार तिच्यावर उपचार सुरु केले. या दरम्यान तिला ऑक्सिजन ची गरज भासू लागली. १० एप्रिल रोजी ही महिला अत्यवस्थ झाली. तिला व्हेंंटिलेटरवर घेण्याची वेळ आली. महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजुक अवस्था होती. रक्ताचे रिपोर्ट देखील चांगले नव्हते. त्यातच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. मात्र, पहिले सिझर असल्याचे आता देखील सिझरच करणे गरजेचे होते. संध्याकाळी डॉक्टरांनी निर्णय घेत ही कोरोना संसर्गाचा धोका पत्करुन गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. व्हेंटिलेटर वर असणाऱ्या या महिलेची सुखरुप प्रसुती झाली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यावेळी महिलेने एका सुदृढ बालिकेला जन्म दिला. रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बाळाला चिरायु च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला १३ दिवस व्हेंंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यावस्थ होती. या दरम्यान रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले. त्यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉ. मेहता यांनी सांगितले.
कोट
४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त होवून प्रकृती चांगली झाली आहे. तिचे बाळ देखील सुखरूप आहे. रुग्णालयात सर्वच आजारातील अत्यवस्थ गर्भवतींच्या प्रसूतीसाठी असणारे ‘हाय रीस्क ऑबस्टेट्रीक युनिट’ यावेळी उपयुक्त ठरले. कोरोनाबाधित महिला आणि तिच्या बाळाला चांगले उपचार देवू शकल्याने त्यांच्या जीवावर बेतणारा धोका टळला, याचे मनापासून समाधान आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे सहकार्य मोलाचे ठरले.
- डॉ. विशाल मेहता
————————————
फोटोओळी : कोरोनामुक्त झालेल्या मातेचा डॉ. विशाल मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बारामतीत झाडाचे रोपटे देवून सन्मान केला.
२१०५२०२१ बारामती—११
——————————————
फोटोओळी—बारामतीत व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित गर्भवतीने बाळाला सुखरूप जन्म दिला.
२१०५२०२१ बारामती—१२
————————————