पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन लागू केला आहे. गेल्या २०-२५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या या लाॅकडाऊनचा राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के घट झाली आहे.गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र हॉटेलांवर क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश असे काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली.त्यात हॉटेल बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. या सगळ्याचा फटका दैनंदिन दूध विक्रीवर झाला आहे. दुधाच्या संकलनाचे प्रमाण कायम आहे, दुधाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने दुधाच्या वितरणावर काही परिणाम झालेला नाही. मात्र, विक्री घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
याबाबत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले की, राज्यात दुधाच्या विक्रीत घट झाली आहे. कात्रजचे रोजचे दुधाचे संकलन २.५६ लाख लीटर आहे. त्यापैकी सुमारे दीड लाख लीटर दूध शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले दूध सध्या खाजगी दूध कंपनीला द्यावे लागत आहे. हॉटेल, चहाची दुकाने,आइसक्रीम उत्पादक हे दूध खरेदी करणारे प्रमुख उद्योग करोनामुळे अनियमित पद्धतीने सुरू आहेत.
किरकोळ विक्रीची दुकाने के वळ ७ ते ११ या वेळेतच सुरू असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांकडून येणारी मागणी बंद झाली. शिवाय हॉटेल, कंपन्यांची उपाहारगृहे, रस्त्यावरील चहाची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे एकूण २० ते ३० टक्के विक्री कमी झाली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर दूध विक्री विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान दुधाची मागणी पूर्ववत झाली. मात्र आता मार्चपासून पुन्हा दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुधाची विक्री जवळपास ३० टक्के कमी झाली असल्याने सुमारे लिटर मागे पाच रुपयांनी दुधाचे कमी रेट शेतकऱ्यांना द्यावे लागत असून दूध संघाच्या वतीने सरकारला पत्र लिहून विनंती केलेली आहे, शिल्लक राहिलेले दूध सरकारने विकत घ्यावे अन्यथा शेतकऱ्याला लिटर माघे ५ रुपयांचे अनुदान अन्यथा दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडेल असे हिंगे यांनी स्पष्ट केले. -------शासनाने तातडीने अनुदान द्यावे शासनाने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघ अडचणीत आले आहेत. दुधाची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. यामुळे दररोज लाखो लिटर दूध शिल्लक राहते. यामुळेच शासनाने शिल्लक राहिलेले दूध विकत घ्यावे अन्यथा शेतकऱ्याला लिटर माघे ५ रुपयांचे अनुदान द्यावे. - विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ