पुणे : रांजणगाव भागातल्या एका नामांकित कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, कोरोना लॉकडाऊन काळात काम बंद झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते. शेवटी करायचं काय? असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. त्याने या परिस्थितीत चोरीचा मार्ग निवडला. त्यानंतर तो सराईत चोराप्रमाणे मोबाईल आणि लॅपटॉप लंपास करायचा. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि त्याचे सर्व चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
देवराम चिल्लावार असे ह्या आरोपीचे नाव आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्याला स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर लोणीकंद, चाकण, यवत, चंदननगर आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे १६ मोबाईल, एक लॅपटॉप आणि दुचाकी असा ६ लाख २ हजार रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय देवराम हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो रांजणगावमधील आशापुरा मार्केट परिसरात राहतो. ओएलएक्सवर मोबाईल विक्रीची जाहिरात पाहून तो विक्रेत्यास भेटायला बोलावत असे. त्यानंतर पैसे आणण्याचा बहाणा करत मोबाईल घेऊन पळून जाई. ही त्याची चोरी करण्याची ट्रिक होती.
देवराम याने एकदा ओएलएक्सवर मोबाईल विक्रीची जाहिरात पाहून एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मोबाईल खरेदी करायचा आहे, अशी बतावणी करत त्यांना स्वारगेट येथे बोलावून घेतले. त्यानंतर मोबाईल पाहण्याच्या उद्देशाने तो हातात घेत आत्ता माझ्याजवळ रोख रक्कम नाही. एटीएममधून काढून देतो, असे त्याने सांगितले. दोघेही एटीएमजवळ गेल्यानंतर विक्रेता दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर देवरामने मोबाईलसह तेथून धूम ठोकली होती. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वारगेट पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, कर्मचारी सज्जाद शेख, महेश जगताप, महेश काटे, सचिन दळवी, शिवाजी सरक, सोमनाथ कांबळे, सोनाली खुटवड यांच्या पथकाने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर लोणीकंद, चाकण, यवत, चंदननगर आणि खडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारे कोणाचा मोबाईल चोरीस गेला असेल तर त्याने पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स्वारगेट पोलिसांनी केले आहे.