लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ’गीतरामायण’ अजरामर करणारे गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या पुण्यातील स्मारक उभारणीच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही संपत नाही. नियोजित स्मारकाचा भूमिपूजन सोहळा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता पुढे ढकलला आहे. पुढील आठवड्यात गदिमांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेऊन स्मारकाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे.
पुण्यात गदिमांचे स्मारक होण्यासाठी गदिमांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे लढा दिला. गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी स्मारक होण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यासाठी महात्मा फुले सोसायटीमध्ये स्मारकासाठी जागा दिली. महापौरांनी स्मारकाच्या निर्धारित जागेवर एक ते दोन महिन्यात भूमिपूजन करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती.
महापौरांनी आश्वासन दिल्याप्रमाणे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार होता. उद्घाटक म्हणून कुणाला आमंत्रित करायचे, याबाबत मान्यवरांशी फोनाफोनी देखील झाली. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापौरांनी स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पुढे ढकलण्याविषयी सांगितले, केवळ छोटेखानी कार्यक्रमातून स्मारकाच्या कामाला सुरुवात करू असे म्हटल्याचे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले. कामाला गती मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे. स्मारक होणे आमच्यासाठी महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
---
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नियोजित गदिमा स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलला आहे. गदिमांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून आठवड्याभरात छोटेखानी कार्यक्रम घेऊन आम्ही स्मारकाचे काम सुरू करणार आहोत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर भूमिपूजन सोहळा नक्कीच करू.
- मुरलीधर मोहोळ, महापौर