पुणे : पुणे शहरात १८९६ साली आलेल्या प्लेगच्या साथीनंतर स्वाईन फ्ल्यू, सार्स या सारख्या संसर्गजन्य आजारांच्या साथी पुण्याने अनुभवल्या. पण या सर्वात घातक ठरली कोरोना (कोविड-१९)ची साथ. ९ मार्च ते ८ डिसेंबर या नऊ महिन्यात आतापर्यंत कोरोनाने १ लाख ७२ हजार ५५९ पुणेकर बाधित झाले तर ४ हजार ५१० जणांचा बळी कोरोनाने घेतला.
पुणे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ़ संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साथीच्या आजारांमध्ये प्लेगनंतरचा हा सर्वात मोठा आजार आहे़ सन २००९-१० मध्ये शहरात स्वाईन फ्ल्यूची साथ आली़ देशातील पहिला रूग्ण व पहिला बळी रिदा शेखच्या रूपाने पुण्यात गेला़ मात्र ही साथ अवघ्या तीन-चार महिन्यातच आटोक्यात आली़ सुमारे ६० हजार व्यक्तींना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली होती़ तर सुमारे दीड हजार जणांचा त्यात मृत्यू झाला, मात्र यापैकी निम्म्याहून अधिक जण हे पुणे शहराबाहेरील होते़
स्वाईन फ्ल्यूनंतर सन २०१२-१३ मध्ये सार्स या आजाराची लाट देशात आली, पण त्याचा कोणताही प्रभाव पुणे शहरात दिसून आला नाही़ या आजाराची एकही व्यक्ती शहरात आढळून आली नाही़
सन २०१४ मध्ये शहरात चिकुनगुनिया व डेंगूची साथ आली होती़ यावेळी डेंगूचे साधारणत: चार हजार रूग्ण आढळून आले़ या दोन्ही आजाराने शहरात कोणाचाही मृत्यू ओढावलेला नाही़