पुणे: अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, पुण्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे, त्यामुळेच येत्या रविवारी जिल्हा आढावा बैठक घेऊ, त्यात काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
स्मार्ट ग्राम व आर आर आबा सुंदर गाव योजनेतील विजेत्या गावांना पुरस्कार देताना पवार यांनी हा इशारा दिला. नागरिकांनी नियम पाळावेत, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे असे आवाहन त्यांनी केले. कठोर निर्णय कोणते हे त्यांनी स्पष्ट केले नाही, मात्र येत्या रविवारी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमात कोरोनापासून बचावाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात येत होते. पुरस्कार विजेते स्टेजवर येण्यापुर्वीच त्यांच्या हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येत होते. मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही याची पाहणी केली जात होती व त्यानंतरच विजेत्यांना स्टेजवर पाठवले जात होते.
पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा आढावा घेऊन कशी आखणी करायची यावर मार्ग काढणार आहोत. पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत रविवारी (दि.21 ) जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
सभागृहातही संयोजकांनी खुर्च्यांमध्ये अंतर ठेवले होते. त्यावर त्याच पद्धतीने बसण्यास संयोजकांकडून वारंवार सांगण्यात येत होते. बंदोबस्ताला असलेले सर्व पोलिस व त्यांचे अधिकारीही नाक व तोंड पुर्ण झाकले जाईल असाच मास्क लावून बंदोबस्ताला उभे होते.