पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या आपल्या मूळ राज्यात कामगार गेले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे ते आता परत येऊ लागले आहेत. विशेषत: पुणे, मुंबईकडे कामगारांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बध लागू केले होते. त्यामुळे हजारो कामगार, छोठे-मोठे व्यावसायिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आपापल्या गावी गेले होते.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गेलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत येऊ लागले आहेत.
----
परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशांत प्रामुख्याने महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्यावतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.
-----
सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांतून कामगारांचे स्थलांतर पुन्हा होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील मुंबई शहराकडे सर्वांत जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल पुणे, नंतर नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहे.
-----
मुले देश-परदेशात; चिंता पालकांची
कोट
मी मूळचा साताऱ्याचा आहे. माझी नोकरी मुंबईत आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी साताऱ्याला गेलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्चपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. एप्रिलमध्ये मुंबईत परतलो. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडं काळजीत आहे. पण काम तर करावेच लागेल ना?
- सचिन रास्ते, नोकरदार
----
कोट
माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पाश्चात्त्य देशापासून सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. याचदरम्यान, आम्ही यंदाच्या वर्षी अमेरिकेची वारी करून आलो. तब्बल पाच महिने त्याच्याकडे राहिलो. तो ज्या ठिकाणी राहतो तिथे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आहे. लोकं फारशी घराबाहेर पडत नाहीत. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही सुखरूप मनाने भारतात परतलो. तरीही आईचं काळीज आहे. त्यामुळे मुलगा लांब आहे म्हटल्यावर काळजी राहणारचं.
- रमा चरणकर, गृहिणी