लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वातानुकूलित प्रवासासाठी नावाजलेल्या शिवनेरीची शान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच कारणाने ओसरली आहे. जिल्हा आगाराच्या ६७ पैकी फक्त ४७ शिवनेरी गाड्या सुरू आहेत. फक्त फेब्रुवारी महिन्याची तुलना केली, तरी मागील वर्षीपेक्षा तब्बल २५ हजार प्रवासी घटले आहेत.
कोरोना विषाणू वातानुकूलित जागेत जास्त प्रमाणात संसर्गित होतो असा समज असल्यानेच या गाडीचे प्रवासी घटले असल्याचे एसटी अधिकाऱ्र्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण गाडी बंद असते. वाहक नसतो. एसी सुरू असल्याने खिडकी उघडता येत नाही. लांब पल्ल्याची गाडी वाहकाला पसंत असेल त्याच ढाब्यावर जेवणासाठी थांबते. या कारणाने शिवनेरीचे नियमित प्रवासीही शिवनेरीचा प्रवास टाळत असल्याचे दिसते.
दादर, मंत्रालय, बोरिवली, ठाणे व औरंगाबाद अशा ५ मार्गांवर शिवनेरी सध्या धावते. आगाराकडे एकूण ६७ शिवनेरी गाड्या आहेत. पूर्वी नाशिक व अन्य काही शहरांमध्येही शिवनेरी जायच्या. पण प्रवासी मिळत नसल्याने त्या सध्या थांबवण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्हा आगाराची शिवनेरीची प्रवासी संख्या ८९ हजार ३११ होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये हीच संख्या फक्त ६३ हजार ७१६ इतकी आहे. म्हणजे, २५ हजार ५९५ प्रवासी फक्त एका महिन्याचेच कमी झाले आहेत.
मार्च महिन्याची आकडेवारी अद्याप पूर्ण झालेली नाही, मात्र त्यातही प्रवासी संख्या कमीच आहे.
शिवनेरीचे प्रवासी भाडे नेहमीच्या गाड्यांपेक्षा दुप्पट असते. मात्र, तरीही विशिष्ट वर्गाकडून शिवनेरीला चांगली पसंती मिळत होती. संपूर्ण प्रवास आरामदायी होत असल्याने प्रवासी जाणीवपूर्वक आरक्षण करून प्रवास करत. आता मात्र आरक्षण होत नाही व जागेवरही गाडीच्या क्षमतेप्रमाणे प्रवासी संख्या पूर्ण होत नाही.
उत्पन्न व्यवस्थित मिळत नसेल तर शिवनेरी चालवणे तोटा वाढवणारेच ठरते. त्यामुळे काही गाड्या थांबवल्या आहेत.
ज्ञानेश्वर रणावरे- विभागीय वाहतूक नियंत्रक
कोरोना विषाणूला एसीचे वातावरण पोषक असते. त्यामुळे या गाडीचा प्रवास टाळण्याकडेच नियमित प्रवाशांचा कल आहे. मीपण त्यामुळेच शिवनेरीने प्रवास करणे थांबवले आहे.
विशाल कसबे- एसटी प्रवासी. लोकमान्य नगर.