पुणे : चीनमध्ये काेराेनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्यातही नागरिकांनी त्याचा धसका घेतला असून, गेल्या तीन दिवसांमध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात गेल्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार या कालावधीत दररोज सरासरी ५०० ते ८०० नागरिक बूस्टर डोस घेत हाेते. आता शुक्रवारी एकाच दिवशी ६ हजार बूस्टर डोस घेतले आहेत. कोविन पोर्टलवरील आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.
चीनसह जपान, ब्राझील, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून भारतातही आराेग्य यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले काही महिने कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला असल्याने बूस्टर डोसला मिळणारा प्रतिसादही थंडावला होता. मात्र, जगभरात वाढत असणाऱ्या कोरोनाच्या उद्रेकाने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
महाराष्ट्रातील १८ वर्षे आणि त्यावरील प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या कोविड लसीचा तिसरा किंवा बूस्टर डोस ६.७१ कोटी लोकांनी अद्याप घेतलेला नाही. सध्या राज्य सरकारकडून कोव्हिशिल्ड लसीचा साठा होत नसल्याने सर्वच केंद्रांवर कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, नागरिक कोव्हिशिल्डबाबत विचारणा करत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे १० लाखांहून अधिक कोव्हॅक्सिन डोस उपलब्ध आहेत. त्याचा वापर पहिल्या, दुसऱ्या किंवा बूस्टर डोससाठी केला जाऊ शकतो. गेल्या तीन दिवसांमध्ये अर्थात २२ डिसेंबरपासून शहरी भागातील लसीकरणात वाढ झाली आहे.
तीव्र वाढ नाही; पण निष्काळजीपणा नको
राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधितांमध्ये कोणतीही तीव्र वाढ झालेली नाही. मात्र, तरीही नागरिकांनी निष्काळजीपणाने वागू नये. सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
लसींचे पुरेसे डोस उपलब्ध
आराेग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर म्हणाले की, आपल्याकडे लाभार्थ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे डोस आहेत. गरज पडल्यास आम्ही केंद्राकडून आणखी मागणी करणार आहोत. सर्व वयोगटातील प्रथम, द्वितीय आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना लस मिळाली पाहिजे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली नसली तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण ही गुरुकिल्ली आहे.