"नीरेमध्ये शुक्रवारपासून मास्कच्या कारवाई कडक करत आहोत. मास्क नसेल, दुकानात गर्दी दिसली, सोशल डिस्टंसिंग दिसले नाहीतर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करणार आहोत. सामान्य माणसांनी काही काम असेल तरच घराबाहेर पडा, काम नसल्यास बाजारपेठेत विनाकारण फिरू नका. घराबाहेर पडू नका. प्रशासनाला सहकार्य करा. जर नीरेमध्ये असेच कोरोना रुग्ण वाढत राहिले तर कडक उपाययोजना कराव्या लागतील, असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या घटत असताना मागील पंधरा दिवसांत नीरा (ता. पुरंदर) शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब असल्यान लोकमतने 'नीरा शहरात कोरोनाचे ३५ अॅक्टिव्ह रुग्ण' या मथळ्याखाली दि. ३० जानेवारीला बातमी प्रसिद्ध केली होती. मागील दोन दिवसांत सोळा रुग्ण वाढले, गुरुवारी नीरा शहरात ५१ कोरोना रुग्ण अॅक्टिव्ह होते. आता पुरंदरचे प्रशासन खडबडून जागे झाले. गुरवारी दुपारी नीरा प्रथमिक आरोग्य केंद्रात तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पारपडली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव, नीरेचे प्रशासक एन.डी.गायकवाड, सर्कल संदिप चव्हाण, तलाठी बजरंग सोनवले, अप्पा लकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागार, सुरेश गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सागर डांगे, आरोग्य सहायक गणेश जाधव, शिवाजी चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, अनिल चव्हाण, विजय शिंदे, प्रमोद काकडे, भय्यासाहेब खाटपे, मंगेश ढमाळ, अमोल साबळे, आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी रुग्णसंख्यावाढीची कारणे व काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या, व्यापारी वर्गामध्ये कोरोनाचा फैलाव हा मोठ्या प्रमाणावर झाला. तुम्ही स्वॅब टेस्टिंगला द्याल तेेव्हा त्याचा रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही दुकानात बसू नका. जर एखाद्याच्या घरातील व्यक्ती पाॅझिटिव्ह आला तर त्याच्या घरातील सगळ्यांचे रिपोर्ट येईपर्यंत दुकान बंद ठेवावे. सहकार्य मिळाले नाही तर पोलिसांमार्फत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आजच्या बैठकीत ठरवले आहे.
नीरेमधील मास्कचे प्रमाण कमी झाले आहे. जे विक्रेते किंवा दुकानदार मास्क लावत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई होईल. सर्व दुकानदारांनी दुकानात दोरी लावावी, सॅनिटाझर ठेवावे, मास्क लावावेत, ग्राहकांना मास्क लावायला सांगावे. बाजारादिवशी दुकानात गर्दी होणार असेल तर दुकानदाराने गर्दी नियंत्रणात ठेवावी. एक वेळेस दुकानात तीन किंवा चारच व्यक्तींना दुकानात प्रवेश द्यावा. दुकानात गर्दी दिसल्यास याबाबत दुकानदारांना जबाबदार धरलं जाईल. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात कोणी कोरोना पाॅझिटिव्ह आले, तर ताबडतोब नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कळवावे.
नीरा (ता.पुरंदर) शहरात गुरवारी ५१ कोरोना रुग्ण अँक्टीव्ह होते. त्या पार्श्वभूमीवर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी शासकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. (छाया : भरत निगडे, नीरा)