मंचर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मंच यांच्या वतीने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चहा-नाष्टा व जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. मंचर शहराचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपाचे संजय थोरात तसेच सुजित देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी अनेक कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. तर अनेक नागरिक कोरोना निदान चाचणीसाठी मंचर येथे येत असतात, यामध्ये खेड,आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यातूनही अनेकजण येत असतात. त्याच बरोबर उपजिल्हा रुग्णलय येथे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. लॉकडाऊनमुळे सकाळी ११ नंतर अनेक आस्थापना बंद असून हॉटेल बंद असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना चहा पाणी, नाष्टा, जेवण उपलब्ध होत नाही. ही गोष्ट लक्षात येऊन माजी सरपंच दत्ता गांजाळे, भाजपचे संजय थोरात यांनी सर्वांना एकत्र आणून हे अन्नछत्रालय चालू केले आहे.
पहिल्या दिवशी सुलाबाई विठ्ठल थोरात यांच्या स्मरणार्थ रंगनाथ नाना थोरात यांनी अन्नदान केले. पुढील दहा दिवसांचे अन्नदान दानशूर नागरिकांनी जाहीर केले आहे. याप्रसंगी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले,अश्विनी शेटे, वसंतराव बाणखेले,भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद कराळे,संजय थोरात,रंगनाथ नाना थोरात,अरुण नाना बाणखेले, सुजित देशमुख, संदीप बाणखेले, सूशांत थोरात आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे, दर दिवशी मोफत आमरसाचे जेवण तसेच सकाळी नाश्ता दिला जाणार आहे.
--
फोटो क्रमांक : १७मंचर माणुसकीची थाळी
फोटोखाली: मंचर शहरात माणुसकीची थाळी हा उपक्रम सुरू करण्यात आला.