लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चोवीस तासांच्या आत एकाच व्यक्तीचे दोन ठिकाणी केलेले कोरोना चाचणीचे दोन अहवाल एकमेकांच्या नेमके विरुद्ध येण्याचा अनुभव एका पुणेकराला आला आहे. यातला नेमका कोणता अहवाल बरोबर आणि कोणता चूक, या गोंधळात तो आता अडकला आहे. खासगी प्रयोगशाळांच्या अहवालांमध्ये असे प्रकार घडत असल्यानेच त्यांचे ‘ऑडिट’ चालू केले असल्याचे यावर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यातल्या बाणेर परिसरातल्या २३ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला कामानिमित्ताने प्रवास करायचा होता. प्रवासासाठी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्याने घराजवळच्या एका खासगी प्रयोगशाळेत चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल ‘पॅाझिटिव्ह’ आल्याने तो काळजीत पडला.
या युवकाने ‘लोकमत’ला सांगितले, “माझी परीक्षा सुरू असल्याने मी घराबाहेर पडलो नव्हतो. तसेच इतर कोणाशीही माझा संबंध आला नव्हता. त्यामुळे टेस्ट पॅाझिटिव्ह आली कशी, असा मला प्रश्न पडला. त्यामुळेच मी पुन्हा टेस्ट करून घ्यायचे ठरवले.” पहिल्या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर अर्ध्या तासातच पुन्हा दुसऱ्या खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिला. या चाचणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. चोवीस तासांत आलेल्या या उलट-सुलट अहवालांमुळे यातला नेमका कोणता अहवाल खरा, असा प्रश्न या युवकाला पडला आहे.
अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. “असे प्रकार घडत आहेत. तक्रारी येऊ लागल्यानेच आम्ही प्रयोगशाळांचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी सुरु झाली असून यामध्ये सर्व प्रोटोकॅाल पाळले जात आहेत का नाही, याची तपासणी केली जात आहे.”