पुणे : ‘आपण कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही काळजी घ्या. परिवारातील सदस्यांची माहिती द्या. त्यांची चाचणी केली आहे का?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करणारा फोन पालिकेमधून एका तरुणाला आला. या फोनमुळे अवाक् झालेल्या तरुणाने आपण मार्च महिन्यात पॉझिटिव्ह झाल्याचे आणि गृह विलगीकरणाचा कालावधी दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याचे सांगितले. अशा प्रकारचा अनुभव दररोज अनेक नागरिकांना येत आहे. आजवर जवळपास २०० पेक्षा अधिक लोकांची नावे बाधितांचा ताज्या यादीत आल्याचेही समोर आले आहे.
हॉटेल व्यावसायिक नीलेश दहिवाल यांनी सांगितले की, त्यांना पालिकेतून सोमवारी फोन आला. तब्येतीची चौकशी करून पॉझिटिव्ह आहात का, अशी विचारणा झाली. कुटुंबीयांच्या बाबतीत चौकशी केली. परंतु, मी स्वतः १६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलो होतो. गृह विलगीकरणात उपचार घेऊन तो कालावधी पूर्ण केला. मात्र, त्या काळात पालिकेतून कोणाचाही फोन आला नव्हता. आता दोन महिन्यांनी एकाच दिवसात दोन वेळा फोन आले आहेत. हा प्रकार रुग्ण जास्त दाखविण्याचा तर नाही ना. रुग्णसंख्या या चुकांमुळे अधिक दिसत असल्याची शक्यता असून नीट पडताळणी होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.