पुणे: प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना सर्वाधिक संसर्ग असलेला संपूर्ण भाग सील देखील करण्यात आले. तरी कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (दि.13) एकाच दिवशी पुण्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या 41 ने वाढली , तर दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला. यामुळे पुण्यातील रूग्णांची संख्या 325 वर जाऊन पोहचली आहे.
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे यासाठी प्रशासनाने आता कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला भाग सील करण्यास सुरुवात केली आहे. तर रूग्णांची वाढती सख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खाजगी डाॅक्टरांची सेवा अधिग्रहीत केले आहेत. सोमवारी विविध रूग्णालयात 217 संशयितांची तपासणी करण्यात आली. या सर्व रूग्णांचे स्वॅब एनआयव्हीला पाठविण्यात आले. यात 41 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये 33 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण पुणे शहरामध्ये तर 4 पिंपरी चिंचवड आणि 4 बारामती नगरपालिका हद्दीत नवीन रूग्ण वाढले आहेत. ------पुण्यात आता पर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या: 325पुणे शहर: 273पिंपरी चिंचवड: 34नगरपालिका हद्द : 9पुणे ग्रामीण : 5एकूण मृत्यु : 32