लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ८१ लाख ४२ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाले म्हणजे आता आपल्याला कोरोना संसर्ग होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे १५ हजार १३७ लोकांना कोरोना लसीकरणानंतर देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लसीकरणानंतर मृत्यूचा धोका कमी झाला असला तरी लस घेतलेल्या ९० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ११ लाख १६ हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली. तर आत्तापर्यंत ८१ लाख ४२ हजार लोकांचे कोरोना लसीकरण झाले आहे. गेल्या काही महिन्यांत लसीकरणानंतर त्यातही कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर लोक अधिक बेफिकीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरणानंतर मास्क वापरण्याची गरज नाही, दोन डोस घेतलेल्या लोकांना मिळत असलेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास या सर्व गोष्टींचा परिणाम दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक वाढले. कोरोनाचा पहिला डोस घेतलेले ०.१७ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ०.२१ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना डोस घेतलेल्या १५ हजार १३७ रुग्णांपैकी ९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
चौकट
कोरोना आणि लस
-लसीकरणानंतर १५ हजार १३७ लोकांना लागण
-पहिल्या डोसनंतर ०.१७ टक्के लोकांना लागण
- दुसरा डोस घेतल्यानंतर ०.२१ टक्के लोकांना लागण
-लसीकरणानंतर आत्तापर्यंत ९० लोकांचा मृत्यू
चौकट
जिल्ह्यातील लसीकरण आणि कोरोना रुग्ण
कार्यक्षेत्र कोरोना लसीकरण लसीकरणानंतर बाधित
पुणे ३४ लाख ९० हजार ६२४ ६ हजार ६०४
पिंपरी-चिंचवड १५ लाख ४७ हजार ५९० ३ हजार ४१५
जिल्हा ३१ लाख ३ हजार ९५२ ५ हजार ११८
एकूण ८१ लाख ४२ हजार ११६ १५ हजार १३७