लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वार्षिक नियतकालिक बदल्या ३० जूनपर्यंत करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी काढले. यामुळे दर वर्षी मे-जून महिन्यात होणाऱ्या बदल्या तूर्ततरी स्थगित झाल्या आहेत.
राज्य शासनाचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यामध्ये केल्या जातात. परंतु यंदा कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्याने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३० जूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबली आहे. सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर, तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची बदली करणे आवश्यक असेल तर सक्षम प्राधिकारी खात्री करून त्याची बदली करू शकतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.