लोणी काळभोर : पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हवेलीच्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता शनिवारी लोणीकाळभोर ग्रामपंचायतीतील चार, तर आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरोना उपाययोजनांचा अभाव दिसत असून नागरिकांकडूनही कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोनाबाधितांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अलीकच्या काही दिवसांमध्ये, तर या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले आहे. बाजारपेठेतील वाढती गर्दी, मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये सॅनिटायझर न ठेवणे यांमुळे कोरोनावाढीला खतपाणी मिळत आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही देखील नागरिकांकडून नियमांची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही.
लोणीकाळभोर ग्रामपंचायतहद्दीत आजअखरे ७६९ रुग्ण बाधित आढळले आहे, तर ७३३ जण कोरेानामुक्त झाले आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २१ जणांवर उपचार सुरू असून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ८४६ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी ८०४ जण बरे झाले आहेत. तर १७ जणांचा मृत्यू झाला असून सध्या २५ जणांवर उपचार सुरू आहेत.
परिसरात कोरोना लसीकरण सुरू केले आहे. विश्वराज हॉस्पिटल येथे २८ जानेवारी ते २८ मार्च या कालावधीत ८९७ जणांना तर प्राथमिक आरोग्य केेंद्र लोणी काळभोर येथे ४ मार्चपासून आजअखेर १ हजार २५ असे एकूण १ हजार ९२२ जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले की, परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बाधितांच्या संपर्कात आलेले अनेकजण सार्वजिनक ठिकाणी वावरताना दिसत आहे. बहुतांश नागरिक मास्क वापर नाही. त्यामुळे यापुढील काळात विनामास्क फिरणारे, विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
१३ लोणीकाळभोर लस
प्राथमिक आरोग्य केेंद्र लोणी काळभोर येथे कोरोना लस घेण्यासाठी आलेले नागरिक.